मोठी बातमी! महाराष्ट्रात २२ जानेवारीला सुटी जाहीर 

अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. हा सोहळा देशभर उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्राने केंद्रीय सरकारी कार्यालयांना हाफ डे सुटी जाहीर केलेली आहे.

त्यानंतर महाराष्ट्रानेही राज्यात 22 जानेवारीला सुटीच जाहीर केली आहे. सरकारने याबाबतचा अध्यादेश जाहीर केला आहे. दरम्यान, देशभरातील आठ राज्यांनी सुटी जाहीर केली असून इतर राज्यांत सुटी जाहीर करण्याची मागणी होत आहे.

देशात तब्बल 500 वर्षांनंतर राम मंदिर (Ram Temple) बांधले जात आहे. या मंदिराच्या लोकर्पण सोहळ्यानिमित्त सुटी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान, केंद्र सरकारने, केंद्रीय सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली.

तर राज्यात सुटीबाबतचा निर्णय घेण्याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारकडे सोपवला होता. त्यानुसार राज्याने आपल्या अधिकाराचा वापर करून 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या अध्यादेशावर उप सचिव रो. दि. कदम पाटील यांची स्वाक्षरी आहे.

दरम्यान, देशातील महाराष्ट्रासह इतर सात राज्यांनी सुटी जाहीर केलेली आहे. छत्तीसगड, गोवा, ओडिशा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांत सार्वजनिक सुटी असणार आहे. तर केरळ, झारखंडमध्ये सुटीची मागणी करण्यात येत आहे.

मात्र आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरी येथे अद्याप सुटी जाहीर केलेली नाही.

Leave a Comment