अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर 

गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ प्रवक्त्यांचे नावे जाहीर केली होती. या नावांच्या यादीतून विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना वगळ्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू मिटकरी हे आक्रमकपणे मांडत होते. मात्र, वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. पण नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत अमोल मिटकरी यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून, या यादीत अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारकाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील स्टार प्रचारक असणार आहेत.

संतोष देशमुख प्रकरणानंतर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आणि त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात मनातील खंत व्यक्त करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच नवी जबाबदारी देण्याची विनंती केली होती. आता धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाने स्टार प्रचारकाची जबाबदारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

कोण कोण आहेत स्टार प्रचारक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

माजी मंत्री, माजी खासदार आणि आमदारांचाही समावेश

तसेच माजी मंत्र्यांवर देखील स्टार प्रचारकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील – चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक – शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन यासंह इतर अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave a Comment