टीईटी परीक्षेने घेतला नगरमधील शिक्षिकेचा बळी

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा डंका वाजत असताना याच परीक्षेने एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेचा करुण अंत केल्याची धक्कादायक घटना घडली. राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या पूजा रोशन ठोंबरे यांचा पुणे येथील नाशिक फाटा येथे टँकरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेने अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, सरकारच्या परीक्षा केंद्रांच्या अजब धोरणाविरोधात संताप उसळला आहे.

शनिवारी 8 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षिका पूजा ठोंबरे (वय 31) या सरकारने बंधनकारक केलेली टीईटी परीक्षा देण्यासाठी राहाता येथून बसने पुण्याला रवाना झाल्या होत्या. रात्री 10 च्या सुमारास त्या नाशिक फाटा येथे उतरल्या. त्यांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोटारसायकल घेऊन आले होते. पूजा आणि त्यांची चिमुरडी मुलगी किमया मोटारसायकलवर बसून काही अंतर जात नाहीत, तोच एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार आणि मुलगी किमया एका बाजूला फेकले गेले, मात्र दुर्दैवाने पूजा या टँकरच्या चाकाखाली आल्या. त्यांचा जागीच अंत झाला. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं.

मृत पूजा ठोंबरे या येवला एसटी डेपोचे असिस्टंट मॅनेजर रोशन ठोंबरे यांच्या पत्नी आणि राहाता तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास लहारे, बाळासाहेब लहारे, तुकाराम लहारे यांच्या भाची होत. त्यांच्या पश्चात पती आणि लहान मुलगी किमया असा परिवार आहे. या घटनेनंतर शिक्षक वर्गात मोठी लाट उसळली आहे. परीक्षा घेताना शिक्षकांना, विशेषतः महिलांना, त्यांच्या जिल्ह्यांतर्गत किंवा जवळची केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी आक्रमक मागणी होत आहे. पूजा ठोंबरे यांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो व्यवस्थेचा बळी असल्याची भावना महिला शिक्षकांमध्ये आहे.

Leave a Comment