अहिल्यानगर(DSNews24 /किरण पुरी) भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाला भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना अनुदानाच्या कक्षेत आणणे, पसमांदा मुस्लिम विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभ व्यवस्था निर्माण करणे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवितरणात वाढ करणे तसेच सरकारी जामीनदाराची अट शिथिल करणे, या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी व आवश्यक कर्मचारी नियुक्त करणे, जिल्हा परिषदांच्या उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे आणि मदरसा आधुनिकीकरण योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणीही करण्यात आली.
ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडेही रऊफ शेख यांनी आयोगाचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील कब्रस्तान व दर्गाह यांच्या अधिकृत नोंदी करणे, ज्या गावांमध्ये कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध नाही तेथे शासकीय जागा उपलब्ध करून देणे, तसेच नोंद असलेल्या परंतु संरक्षक भिंत नसलेल्या कब्रस्तानांना पुढील तीन वर्षांत संरक्षक भिंती उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
वक्फशी संबंधित नोंदणी व इतर सामान्य कामांसाठी नागरिकांना छत्रपती संभाजीनगर येथे वारंवार जावे लागू नये, यासाठी जिल्हास्तरावर सुविधा अथवा संपर्क केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
समाजामध्ये तेढ व अशांतता निर्माण करणाऱ्या द्वेषपूर्ण अथवा चिथावणीखोर वक्तव्यांवर तक्रारदाराची वाट न पाहता कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनाही रऊफ शेख यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, दक्षिण जिल्हाध्यक्ष अकिल इनामदार, मोहसीन सय्यद, शफीक बागवान, साहिल पटेल, अबुझर मोमीन, ताहीर मिस्तरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते
“मुस्लिम समाजातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक आहे. केवळ योजना जाहीर होऊन उपयोग नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रश्नांवर आयोगाने शासनाकडे सकारात्मक शिफारसी करून पाठपुरावा करावा,” अशी भूमिका मांडली. यावेळी निवेदनातील विविध मुद्दे प्यारे खान यांनी जाणून घेतले असून, मुस्लिम समाजाच्या प्रश्नांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासह शासन स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
रऊफ शेख – जिल्हाध्यक्ष, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, अहिल्यानगर उत्तर जिल्हा
