अहिल्यानगर – आगामी २०२९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. पक्षाकडून राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेसेनेने आतापासूनच सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नियुक्त्यांमध्ये मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक, पक्षातील विविध पदाधिकारी तसेच तरुण चेहऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय संघटन मजबूत करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी वाढविणे, या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
अहिल्यानगर-शिर्डीची जबाबदारी सुनील शिंदेंकडे
ठाकरेसेनेकडून शिर्डी-अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघासाठी सुनील शिंदे यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात ठाकरेसेना आगामी काळात संघटनात्मक पातळीवर कोणती रणनीती आखते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कल्याण-भिवंडीची जबाबदारी वरुण सरदेसाई यांच्याकडे देण्यात आली असून, सातारा-सांगलीसाठी नितीन बानुगडे-पाटील, छत्रपती संभाजीनगरसाठी आशीष चेंबुरकर, शिरूरसाठी किरण तावडे आणि पुणे जिल्ह्यासाठी सचिन पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘या’ नेत्यांवरही महत्त्वाची जबाबदारी
सोलापूर-माढ्यासाठी सुषमा अंधारे, नाशिक-दिंडोरीसाठी रविंद्र मिर्लेकर, बुलढाण्यासाठी नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर, अकोल्यासाठी नितीन देशमुख आणि नीलेश घुमाळ, तर अमरावतीसाठी नितीन देशमुख आणि डॉ. किशोर ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोलीसाठी बबनराव थोरात, कोल्हापूरसाठी अरुण दुधवडकर, बारामतीसाठी संजय सावंत, धुळ्यासाठी अशोक धात्रक, रावेरसाठी गुलाबराव वाघ आणि नंदुरबारसाठी मुकेश साळुंके यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अनेक लोकसभा मतदारसंघांत संघटनात्मक जबाबदाऱ्या
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी प्रदीप बोरिकर, रायगडसाठी संजय मानाजी कदम, मावळसाठी प्रसाद भोईर, पालघरसाठी विलास पोतनीस, साताऱ्यासाठी उदय ढळवी, सांगलीसाठी स्वप्नील कुंजीर आणि हातकणंगलेसाठी महेंद्र इंदुलकर यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, यवतमाळ-वाशिम, वर्धा, नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांसाठीही संपर्कप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत.
४० लोकसभा मतदारसंघांसाठी करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमुळे ठाकरेसेनेने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारीचा श्रीगणेशा केल्याचे चित्र आहे. अहिल्यानगर-शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी सुनील शिंदे यांच्याकडे दिल्याने आगामी काळात जिल्ह्यातील ठाकरेसेनेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
