महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी ( HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
दरम्यान राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या नंतर जु्न्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम बंद होते. या गोंधळात सहा-सात दिवस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नव्हत्या.
यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल विलंबाने लागेल अशी भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होती. परंतु आता मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
