शिर्डीत शिवसेना विरूद्ध शिवसेना, जनतेचा कौल कुणाला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ मनसेसाठी मागितले होते अशी चर्चा होती. याशिवाय महायुतीमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शिर्डी मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र, येथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या दोन वेळा विजयी झालेल्या विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आली आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाने आपले जुने खिलाडी भाऊसाहेब वाकचौरे यांना येथून उमेदेवारी दिली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना झाली. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यावेळी ते विजयी झाले होते. पण, 2014 च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेने तिकीट दिल्यामुळे नाराज झालेले भाऊसाहेब कॉंग्रेसमध्ये गेले.

त्यांनी त्या पक्षातून निवडणूक लढविली. पण, ते पराभूत झाले. आता शिवसेना पक्षात दोन गट पडले. त्यामुळे भाऊसाहेब यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली. शिर्डीकरांनी 2009 पासून येथून शिवसेना उमेदवाराला जिंकून दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिर्डीकर कोणत्या शिवसेना उमेदवाराला विजयी करतात याची उत्सुकता आहे.

Leave a Comment