राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने ते चर्चेत आले होते.
लग्न साधे करा, खर्च कमी करा असं म्हणणार्या इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सडकून टीकाही झाली होती. अशातच आता इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नची पत्रिका समोर आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
कधी आहे लग्न?
इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल यांच्याशी होणार आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी पार पडणार आहे. एस आर थोरात डेअरी जवळ राजापूर रोड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. त्याआधी 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब, संगमनेर येथे हळदी समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला वारकरी सांप्रदायातील अनेक दिग्गज किर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हजर राहून आशीर्वाद देणार आहेत. तसेच विवाहाच्या दिवशी 4.30 ते 6.30 या कालावधीत ह. भ. प. डॉ नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण ?
इंदोरीकर महाराज यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी इंदोरीकर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लग्नाचे निमंत्रण दिले. साखरपुडा झाल्यानंतर ट्रोल झाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह अधिक थाटामाटत करणार अशी भूमिका जाहीर केली होती, त्यानंतर आता हे लग्न अधिक थाटामाटात होणार आहे.
