मुंबई – आगामी विधानसभा निवडणुक (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच विरोधी पक्षातील अनेक आमदार (MLA) उमेदवारीसाठी सत्ताधाऱ्यांकडे फिल्डिंग लावतांना दिसत आहेत. अशातच आता विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) काल (दि.१३) रोजी रात्री वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली असून ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि नांदेडमधील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात हे दोन्ही आमदार काँग्रेस सोडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर (MLA) काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असेही सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करुन पक्षासोबत बेईमानी करणाऱ्या या आमदारांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असा आदेश दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली असली तरी या दोन्ही आमदारांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात बोलतांना खोसकर म्हणाले की, “मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मी काँग्रेससोबत होतो आणि आगामी काळातही काँग्रेससोबतच राहणार आहे. मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे”, असा दावा त्यांनी केला आहे.
तर जितेश अंतापूरकर म्हणाले की, “मी ई-पिक पाहणी अहवालासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमच्याकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती, त्यामुळे मी भेट घेतली. यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही”, असे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले.
