अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या बहिणीला सासरी सोडायला जाताना झालेल्या अपघातात भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्षय मरकड असे अपघातात मृत पावलेल्या भावाचे नाव आहे. शेवगाव तालुक्यातील घोटन या ठिकाणी हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामुळे मरकड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कसा झाला अपघात?
पैठण तालुक्यातील सोलनापूर येथे सासरी राहत असलेली बहिण अश्विनी महेश खराद ही रक्षाबंधन निमित्त आपल्या दोन भावांना राखी बांधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिरी आपल्या माहेरी आलेली होती. आपल्या बहिणीला पुन्हा सासरी सोडण्यासाठी तिचा लहान भाऊ अक्षय विजय मरकड हा हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या मोटरसायकल वरून निघाला होता.
शेवगाव तालुक्यातील घोटन येथे समोरून मोटारसायकल वरून आलेल्या मद्यपीने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अक्षय याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याला नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराअगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या अपघातामुळे मरकड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
