सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसह लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले. भाजपची कार्यपद्धती ही जनतेला मान्य नसून खड्ड्यांचा रस्ता म्हणून मृत्यूचा सापळा बनलेला नगर मनमाड रस्ता वर्षानुवर्षे सत्ता असून का होत नाही? असा सवाल करतानाच शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उघडवा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते
याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अत्यंत सहज पद्धतीने शेतकर्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. करोना काळात या सरकारने चांगले काम केल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. मात्र मागील नऊ महिन्यांपासून आलेल्या सरकारने एकमेकांवर केलेले आरोप, त्यांच्या वागण्याची पद्धती हे पाहता राजकारणाचा पोत सध्या रसातळाला गेला आहे. सुप्रीम कोर्टातून नक्की न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्याच क्षणाला राज्यातील सरकार कोसळेल. कारण भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही.
3560 किलोमीटर पदयात्रा करणार्या राहुल गांधींच्या प्रश्नाला देशाचे पंतप्रधान उत्तर देत नाहीत. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्याकरिता धार्मिकतेला पुढे केले जात आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. राहाता तालुका पूर्वी वैभवशाली तालुका होता 40 ट्रक पेरू या तालुक्यातून जात होते, ऊस, वाटपाणी अशी समृद्धी असलेल्या या तालुक्याचा विकास खुंटला आहे. इतकी वर्ष घरात सत्ता असताना नगर मनमाड रस्ता का होत नाही. यामुळे हा खड्ड्यांचा आणि मृत्यू सापळा असलेला रस्ता म्हणून राज्यात कुप्रसिद्ध झाला आहे.
आपण लोकशाही मानणारे आहोत. कधीही इतर तालुक्यांमध्ये ढवळाढवळ केली नाही. मात्र येथील दहशतीला लोक आता कंटाळले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन सर्व निवडणुका लढवा. शिर्डी मतदार संघातील दहशतीचे झाकण जनतेच्या एकतीतून उडवायचे आहे.
शेती महामंडळाचे साठ वर्ष सुरू असलेल्या लढा आपण महसूल मंत्री झाल्यानंतर तातडीने सोडवला. मात्र या प्रश्नाच्या संघर्षाला इतकी वर्ष का लागली हे ओळखा. याचे कारण म्हणजे जनतेला पिचवत ठेवण्याचे झुलवत ठेवायचे हे येथील राजकारण आहे. आपण सर्वसामान्य जनतेबरोबर असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मजबूतपणे एकत्र या असे आवाहन त्यांनी केल.
