साहेब आमदार झाले म्हणून विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गार – बेटवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांचे विधानसभा निवडणुकीचा जल्लोष करीत असताना निधन झाले आहे. दौंड विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा आमदार राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना त्यांचे निधन झाले आहे.

अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील नगर मोरी येथील शासकीय धान्य गोदामात (ता. २३) मतमोजणी सुरू होती. दुपारी मतमोजणीत राहुल कुल यांनी मोठी आघाडी घेतल्याने महायुतीच्या समर्थकांचा मोठा जल्लोष सुरू होता. नगर मोरी चौकात अतिशय कर्कश आवाजाचा आणि ह्रदयाची धडधड वाढविणारा डीजे सुरू होता. दरम्यान नगर मोरी चौकात राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करीत असताना अंकुश उर्फ बाळासाहेब रामराव भोसले ( वय ६२ ) यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला.

त्यांच्यासमवेत असणार्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने दौंड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. प्रगतशील शेतकरी सागर भोसले यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे, असा परिवार आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार सुभाष बाबूराव कुल यांच्या अकाली निधनानंतर बाळासाहेब भोसले यांनी राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली गार – बेटवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंचपद व गार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते. आमदार राहुल कुल यांचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या विजयसभेत नूतन आमदार राहुल कुल यांनी बाळासाहेब भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Leave a Comment