संगमनेर (DSNews24 / किरण पुरी) तालुक्यातील सुकेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सुकेवाडीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट आणि गाव स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात जिल्हा परिषद अहिल्यानगरचे जल जीवन मिशन व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाशी संबंधित प्रकल्प संचालक राजेंद्र देसले आणि सचिन थोरात यांनी उपस्थित महिलांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा अशा चार प्रकारांत कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. घरातूनच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास त्याची विल्हेवाट लावणे सुलभ होते आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत मिळते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत आणि गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती, प्लास्टिकमुक्त गावाची संकल्पना आणि स्वच्छतेचा मानवी आरोग्याशी असलेला संबंध याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. स्वच्छतेच्या सवयी घराघरांत रुजवून गावाच्या स्वच्छतेत प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला समनापूरचे ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रोडे, कुरणचे ग्रामपंचायत अधिकारी नितीन सोनवणे आणि समूह समन्वयक योगेश पारखे उपस्थित होते. आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
गावात घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण करणे, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करून सुकेवाडी गाव स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त बनविण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प यावेळी महिलांनी व्यक्त केला.
