विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे सणसणीत प्रत्युत्तर

केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते.भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं,असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केला होता. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

आदित्य ठाकरेंचा पोरखेल संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल असे वाटत होते. एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे.

सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

विखे-पाटील यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत(Arvind Savant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे रोज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात. शिवसेनेतही होते. कोणता पक्ष शिल्लक राहिला का विचारा, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

Leave a Comment