रविंद्र राजदेवांच्या इशाऱ्यानंतर पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा, टाकळी गटात लसीकरण मोहीम सुरू 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातून पशुपालकांची चिंता व्यक्त करणारी माहिती समोर आली आहे. कारण लंपी रोगाने पुन्हा डोकं वर काढले आहे. या लंपी त्वचा रोगामुळे पशुपालक धास्तावला आहे. टाकळी ढोकेश्वर गटातील विविध गावांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना झाला आहे. या आजाराबाबत बळीराजा अनभिज्ञ असून तो भयभीत झाला आहे. या आजारामुळे बाधित जनावरे दगावण्याची शक्यता असून पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण मोहीम राबवावी असा इशारा निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी दिला होता.

अखेर रविंद्र राजदेव यांच्या इशाऱ्यानंतर पशुसंवर्धन विभागाने खडबडून जागे होत लसीकरण मोहीम सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील रविंद्र राजदेव यांनी बळीराजांना केले आहे.

लंपीची लक्षणे…

जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मि.मी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे कमी अथवा बंद, दूध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे आदी लक्षणे दिसून येतात.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी…

बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचिड, तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.

Leave a Comment