मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसाचा फटका रस्ते मार्गासह रेल्वे मार्गाला बसला. लोकल ट्रेन आज पूर्णपणे खोळंबली होती. त्यानंतर आता मोनोरेलला देखील मोठा फटका बसला आहे.
भक्तीपार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान जाणारी मोनोरेल अचानक थांबवण्यात आली. गेल्या जवळपास तासाभरापासून मोनोरेल इथे थांबली होती. प्रवाशांनी अतिशय भरगच्च अशी भरलेली ही ट्रेन होती. अचानक तांत्रिक कारणास्तव ही मोनोरेल थांबली होती. ही मोनोरेल एका बाजूला झुकलेली आहे. मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी आहेत. पण तासाभरापासून आतमधील एसीदेखील बंद आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. या भयानक परिस्थित आता अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
ही मोनोरेल सव्वा सहा वाजेपासून जागेवर स्तब्ध झाली. मोनोरेल बंद पडल्यानंतर गाडीतील एसी देखील बंद झाली. बराच वेळ झाला तरी मनोरेल सुरु होत नाही म्हणून गाडीतील प्रवासी अस्वस्थ झाले. यावेळी दुसरी एक मोनोरेल तिथे आली. ही मोनोरेल अडकलेल्या गाडीला टुईंग करुन घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. पण ते शक्य झालं नाही. या दरम्यान पाऊण तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला. यामुळे नागरीक भयभीत झाली. या मोनोरेलचे दरवाजे बंद आहेत आणि एसी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत.
गाडीतला वीज पूरवठा खंडीत
गाडी चालू होत नसल्यामुळे प्रवासी भयभीत झाले. अनेक प्रवासी आतमधून आम्हाला बाहेर काढा म्हणून ओरडत आहेत. अनेक जण दरवाजा जोरजोरात वाजवत आहेत. आम्हाला बाहेर काढा, असं आवाहन ते करत आहेत. या भीतीदायक परिस्थिती अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्मिशानक दलाकडून सिडीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाकडून मोनोरेलचं इमर्जन्सी डोअर तोडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. या दरम्यान सध्या गाडीतील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना वेन्टिलेशनचा त्रास होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रवाशांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे. पोलिसांकडूनही नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे. संबंधित परिसरात दोन्ही बाजूचा रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी काम सुरु आहे. प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
