संगमनेर(DSNews24/किरण पुरी) कलर्स मराठी वाहिनी वरील सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून महाराष्ट्रभर पोहोचणारा गायक अविनाश कदम व गायिका प्रिती नवघिरे यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईराम गृपच्या वतीने आयोजित केलेल्या साई संगित भजन व भांडार गितांचा कार्यक्रम आपल्या गोड मधूर आवाजात साईबाबांचे दमदार भजन व गाण्यांची झलक सादर केली. यावेळी अक्षरशः उपस्थित साईभक्तांनी या खास कार्यक्रमांचा मोठ्या उत्साहात आनंद लुटला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश कदम यांनी साईबाबांवर गायलेल्या भजनावर उपस्थित साईभक्तांनी नाचून आनंद लुटला.
यावेळी कार्यक्रमाचा प्रारंभ अविनाश कदम यांनी मोरया गाण्याने केला. त्यानंतर शिर्डी वाले साईराम, मेरे घर के आगे साईनाथ, साईला भेटाया तुम्ही येताय का, एकच राजा इथं जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, साईनाथा, येळकोट येळकोट जय मल्हार, गौळणी, तुला खांद्यावर घेईल, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, राम आयेंगे, बांगड्याची माळ अशी भजन, गौळणी सादर करण्यात आली. शेवटी साईबाबांच्या आरतीने या कार्यक्रमाचा शेवट झाला. यावेळी गायक अविनाश कदम यांना प्रकाश पारखे, गणेश गोर्डे, सौरभ रणधीर, मंगेश बिडवे यांनी साथ दिली.
यावेळी गायक अविनाश कदम यांनी आपल्या भजनांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते. शेवटी साईबाबांच्या भजनांवर तर साईभक्तांनी साईबाबांचा जयघोष करत नाचून आनंद लुटला. त्यामुळे कार्यक्रमाच रूपच पालटून गेले होते. साईराम गृपने पहिल्यांदाच बिरेवाडीत असा साई भजनाचा कार्यक्रम आयोजित करत यशस्वीपणे पार पडला.
दरम्यान गेल्या २० वर्षांपासून साईराम गृपच्या वतीने श्री क्षेत्र बिरेवाडी ते श्री क्षेत्र शिर्डी असे साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचे २१ वे वर्षे होते. तसेच दरवर्षी दिंडीच्या सांगतेला शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा घेतल्या जात होत्या.
मात्र यंदाच्या वर्षी साईराम गृपने साईभक्तांसाठी साई भजनाचा खास कार्यक्रम ठेवला. सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांनी या कार्यक्रमात आपल्या गोड आवाजातून साईबाबांची भजन, गौळणी सादर केली. तसेच हा खास कार्यक्रम बिरेवाडीकरांना पहिल्यांदाच साईराम गृपच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमासाठी हजारो साईभक्तांनी उपस्थित राहून साक्षीदार बनले आहे.
