राहाता – तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे सोमनाथ जिजाबापू गाडगे ( वय ३६) या शेतकर्याचा सोमवारी सायंकाळी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात त्यांनी कांदा लागवड केली.
सोमवारी काही महिला मजुरांना कांदा काढणीचे काम दिले होते. दिवसभर कांद्याची काढणी केल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यावेळी महिला मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागदाच्या आश्रयाला असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये जागेवरच त्यांचा मृत्यू झाला
सोमनाथ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई असा परिवार आहे. या घटनेने लोणी खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.
