भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. आज सकाळी नागपूरजवळ एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातातून खासदार पडोळे आणि त्यांचे सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. मात्र एकाच मार्गावर आणि एकाच पद्धतीने खासदार पडोळे यांच्यासोबत तिसरा अपघात झाला आहे. त्यामुळे यामागे घातपाताचा कट तर नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याकरिता खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडारा येथून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. सकाळी त्यांचा ताफा नागपूरजवळील हल्दीराम समोर आला होता. त्याचवेळी एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की खासदारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, एअरबॅग्ज आणि वेळेत मिळालेल्या संरक्षणामुळे डॉ. पडोळे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
या अपघातामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, डॉ. पडोळे यांच्यासोबत याच मार्गावर झालेला हा तिसरा अपघात आहे. तिन्ही वेळा अपघात एकाच मार्गावर झाले आहेत. तिन्ही वेळा ताफ्यातील गाडीला ‘ट्रक’नेच धडक दिली आहे. अपघाताची पद्धतही तिन्ही वेळेस सारखीच असल्याचे समोर आले आहे.
एकाच लोकप्रतिनिधीसोबत वारंवार अशा घटना घडत असल्याने समर्थकांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा केवळ योगायोग नसून यामागे एखादा मोठा कट किंवा घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकाच पद्धतीने वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली.
