अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात 30 व 31 मार्चला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 1 व 2 एप्रिल या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वार्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यांच्या शेवटच्या टप्प्यात आणि एप्रिलच्या तोंडावर वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. मागील पंधरवड्यात जिल्ह्यात सलग तीन दिवस वादळी पावसासह गारपिट झालेली आहे. यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आता पुन्हा वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने शेतकर्यांनी आपल्या शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी.
बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
