सोनांबेत आध्यात्मिकतेचा सुवास दरवळला ; आद्यगुरु शंकराचार्य जयंती उत्साहात साजरी 

सिन्नर – आध्यात्मिकतेचा सुवास दरवळवणारा आणि भक्तिभावाने ओथंबलेला आद्यगुरु शंकराचार्य जयंती उत्सव सोनांबे येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दशनाम गोसावी समाज संस्था व श्री गोवर्धन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने गावातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध केले.

कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात आद्यगुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर श्री नागेश्वर महाराजांच्या समाधीचे विधिवत पूजन व्हा. चेअरमन भाऊसाहेब पवार व संचालक अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या पूजन विधीस वसंत गोसावी यांनी मंत्रोच्चारांसह पौरोहित्य केले. मंत्रघोष आणि भक्तिरसाच्या लहरींनी परिसर भारावून गेला होता.

या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर, संचालक दीपक वारुंगसे, विठ्ठलराजे पवार, निवृत्ती बोडके, शुभम डावरे, व्यवस्थापक संदीप घोडे, व्यवस्थापक विनोद रोकडे, तसेच उद्योजक दशरथ पवार, पंढरी पवार, रामभारती गोसावी, सौ. विमल गोसावी, रामदास बोडके, हरिश्चंद्र सातपुते, माजी उपसरपंच तानाजी पवार, संदीप पवार, तुकाराम बोडके, गणेश वारुंगसे, विष्णू बोडके, बाळासाहेब पवार, रुंजाजी बोडके, पंढरी पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात अद्वैत वेदांताच्या गूढ तत्त्वज्ञानाचा गौरव करत आद्यगुरु शंकराचार्य यांच्या कार्याची महती विशद केली. भारतीय संस्कृतीच्या जतन व प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.या उत्सवात श्रद्धा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आयोजकांच्या परिश्रमांना ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाची साथ लाभल्याने हा सोहळा गावाच्या आध्यात्मिक परंपरेचा अभिमान ठरला.

Leave a Comment