लेकीच्या लग्नात लाखभर लोकांसमोर पाय धरले, इंदोरीकर महाराजांचे गुरु कोण आहेत?

मुंबई : निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. त्यांच्या विनोदी कीर्तनाच्या शैलीतून व्यसनाधीनता, अंद्धश्रद्धा, कुटुंबात होणारे तंटे, गुन्हेगारी वर्तुळात तरुणांचा सहभाग अशा मुद्द्यांवर परखडपणे विचार मांडून समाज प्रबोधन करण्याचे काम गेली चार दशके इंदुरीकर महाराज करतात.

त्यांच्या कीर्तनांना महाराष्ट्रात मोठी मागणी असते. अगदी त्यांचे कीर्तन हवे असेल तर सहा-सहा महिने आधी तारखा आरक्षित कराव्या लागतात. महाराष्ट्रात असा एक तालुका नसेल जिथे इंदुरीकर महाराजांनी कीर्तन केले नसेल. अनेकदा कीर्तनातून ते महिलांबद्दल अद्वातद्वा बोलून वाद ओढावून घेतात. त्यांच्या कीर्तनात स्त्रीला कमी लेखल्याचा आक्षेप अनेक जण घेतात, असे असले तरी त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे.

इंदुरीकर महाराजांच्या मुलीचे नुकतेच लग्न पार पडले. संगेमनेरमध्ये लाखभर लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते ग्रामपंचायत सदस्यापर्यंत शेकडो मान्यवर हजर होते. कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या लग्नात इंदुरीकर महाराजांच्या गुरूंचीही हजेरी होती.

लेकीच्या लग्नात गुरूला बोलावलं, मान सन्मान केला, लाखभर लोकांसमोर पाय धरले

आपल्या कीर्तनरूपी सेवेतून समाजाच्या व्यंगावर बोट ठेवून प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज यांच्या आशीर्वादासाठी कीर्तनस्थळी रांग लागते. जिकडे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन तिकडे त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी लोकांची स्पर्धा असते. यावर बोलताना त्यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत फटकेबाजीही केली होती. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे ज्या इंदुरीकर महाराजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी त्यांच्या भक्तांची रांग लागते, त्या इंदुरीकरांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांच्या गुरूंच्या पायावर डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले, तसेच शाल श्रीफळ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला.

इंदुरीकर महाराज यांचे गुरू कोण आहेत?

इंदुरीकर महाराज हे डॉ. नारायण महाराज जाधव यांना गुरू मानतात. डॉ. नारायण महाराज जाधव हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया या गावचे. त्यांचे बीएएमस झाले असून पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि तत्त्वज्ञानात त्यांनी एमए केले आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतले. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे काही वर्षे वैद्यकीय सेवा केल्यानंतर वारकरी परंपरेत त्यांचे मन रमले.

नारायण महाराज जाधव हे आळंदीतील एक प्रख्यात वेदांताचार्य आणि कीर्तनकार

डॉ. नारायण महाराज जाधव हे आळंदीतील एक प्रख्यात वेदांताचार्य आणि वारकरी कीर्तनकार आहेत. त्यांना २०२३ चा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रतिष्ठित ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानेश्वरी, भागवत आणि वेदांत विषयाचे ते अभ्यासक असून त्यांनी वारकरी शिक्षण संस्थांमधून शेकडो साधक घडवले आहेत.

डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या घरातच वारकरी सांप्रदायाचा वारसा होता. त्यामुळे यशस्वीपणे वैद्यकीय सेवा दिल्यानंतर त्यांची पावले आळंदीकडे वळाली. सद्‍गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी संत साहित्याचा सखोल अभ्यास केला. सांप्रदायातील अनेक ग्रंथांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

Leave a Comment