संगमनेर(DSNews24/किरण पुरी) घारगाव पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेले साकूर हे सर्वात मोठं गाव आहे. त्यासाठी वरीष्ठांनी आम्हाला साकूरवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच साकूरपासून घारगाव पोलिस स्टेशनच अंतर अधिक आहे. याठिकाणी गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी साकूरसाठी स्वतंत्र एक पोलिस उपनिरीक्षक व दोन – तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवणार असल्याचे घारगाव पोलिस स्टेशनचे नुतन पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी सांगितले.
घारगाव पोलिस स्टेशनचा नवीन पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी नुकतीच साकूर येथे गाव भेट दिली असता यावेळी ते बोलत होते. गावांमध्ये प्रतिष्ठीत नागरिकांसोबत पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी समन्वय साधून कायदा सुव्यवस्थेविषयी सर्व माहिती यावेळी जाणून घेतली.
यावेळी साकूर येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयात ग्रामस्थांच्या वतीने नुतन पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, बाळासाहेब गळंगे, संतोष खेमनर, बाजीराव खेमनर, राजू गोसावी, कोंडाजी कुदनर, रमेश पेंडभाजे, रफिक चौगुले, विकास पवार , बंडू खेमनर, अझर पटेल आदि उपस्थित होते.
नुतन पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पुढे म्हणाले की, साकूरमधील परिस्थिती चांगली आहे. सर्व जातीय धर्मांचे लोक येथे वास्तव्यास आहे. तसेच समस्या कोणतीही असो त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करा. अपघाताचे प्रमाण १०० टक्के कमी करण्यासाठी वाहतूकीवर नियंत्रण ठेवून त्यासाठी सर्व व्यवस्थेसाठी प्रयत्न करू. परीसरातील सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणेकरून काही गोष्टींना आळा बसेल. गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी रात्री गस्त वाढवू. तसेच ज्या घटना घडतील त्याचा शोध लावून अवैध धंदे, वाळू तस्करीवर कारवाई करू. अल्पवयीन पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यांच्याकडे आई वडीलांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच तंटामुक्त समितीच्या माध्यमातून किरकोळ तंटे गावातच मिटविण्यासाठी प्रयत्न करा व वाहतूकीचे सर्व नियम पाळा. दुचाकीस्वाराने हेल्मेट घालूनच प्रवास करा व लायसन्स, इन्सुरन्स काढा. तसेच मोबाईल येणाऱ्या अनोळखी नंबरच्या फंद्यात फडू नका असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी केले.
शंकरराव खेमनर म्हणाले की, साकूरची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. गुण्यागोविंदाने सर्व धर्मांचे लोक येथे राहतात. लोकसंख्या अधिक असलेले घारगाव पोलिस स्टेशन हद्दीतील साकूर हे गाव आहे. पोलिस स्टेशनला अतिशय कमी स्टाफ असताना पोलिस कर्मचारी काम करतात. आजपर्यंत सर्व पोलीस निरीक्षकांनी उत्कृष्ट काम केले. नुतन पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांचा आगामी कार्यकाळ चांगला जावो.
रऊफ शेख म्हणाले की, घारगाव पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक पदाची जी प्रतीक्षा होती पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या माध्यमातून ती पुर्ण झाली. त्यांनी गोंदीया, नगर शहरात उत्कृष्ट काम केले. आता त्यांच्यापुढे सामाजिक, राजकीय, गुन्हेगारीच मोठ आव्हान असणार आहे. साकूर हे सर्व गोष्टींनी विसकित असणार गाव आहे. जवळपास २६ ते ३० गावांचा संपर्क साकूरच्या बाजारपेठेशी येतो. दर बुधवारी साकूरमध्ये आठवडे बाजार भरतो. त्यामुळे साकूर चौफुली ते बसस्थानकपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यावर पोलिस प्रशासनाच नियंत्रण असणे गरजेचे आहे. अवैध वाळू उपसा, अवैध धंद्याना आळा घालावा. सोशल मीडियावर नियंत्रण असावे त्यासाठी ठोस पाऊल उचलावे. तसेच मोठं मोठ्या गुन्ह्याच्या तपासासाठी गती देण्यासाठी प्रयत्न करावे. साकूरसाठी स्वतंत्र पोलिस उपनिरीक्षक देण्यात यावा जेणेकरून जनतेच्या तक्रारीसाठी सोयीस्कर होईल. तसेच घारगाव पोलिस स्टेशनमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू. नुतन पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांचा उत्कृष्ट कायदा सुव्यवस्थेचा कार्यकाळ घडावा असे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख म्हणाले.
थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर म्हणाले की – साकूर हे ३० गावांना जोडलेले असून मध्यवर्ती वसलेले गाव आहे. गावात २८ जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. शंकरराव खेमनर व स्व. अशोकराव खेमनर यांनी या गावाची घडी बसविली. गावात केसेस कमी आहे. बऱ्याचशा केसेस समझोता करून मिटविले जात असल्याने त्या पोलिस स्टेशनला जात नाही. दरवर्षी सर्व सण उत्सव अतिशय शांततेत पार पडतात. १२ ते १५ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात शैक्षणिक घडी चांगली बसली आहे. नुतन पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
