महाराष्ट्र सुन्न! राष्ट्रीय महिला कुस्तीपटूची किल्ल्यावरुन तीन मुलांसह उडी…..

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे

या घटनेत त्यांच्या एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जुळ्या मुलींपैकी एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीरा नावाची मुलगी गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृतीही नाजूक असल्याची माहिती आहे.

‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळख

अश्विनी मनोहर पौळ यांना कुस्ती क्षेत्रात ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके जिंकली होती. मात्र, तीन मुलांसह त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांचा सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप

या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. अश्विनी पौळ यांनी नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घेतला, तसेच या घटनेमागे कौटुंबिक कारणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

कोण होत्या अश्विनी पौळ?

अश्विनी पौळ (मोहिते) या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या, क्रीडा क्षेत्रात त्यांना ‘महाराष्ट्राची वाघिणी’ म्हणून ओळखले जात होते. अश्विनी यांच्या कुटुंबात वडील, भाऊ, आई आणि बहीण हे सर्वच कुस्तीपटू आहेत; विशेष म्हणजे त्यांचे पती मनोहर पौळ हे देखील कुस्तीपटू आहेत. वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी जिद्दीने मुलीसाठी घरीच कुस्तीची तालीम (सराव केंद्र) तयार केली होती. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम (केरळ) येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर २००८ व २००९ मध्ये गुरुदासपूर (पंजाब) आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावले सुवर्ण पदक. २०१० मध्ये भोपाल, कानपूर आणि हरियाणा, तसेच बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजवत संपूर्ण कारकिर्दीत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांवर कोरले नाव.

Leave a Comment