बिग ब्रेकिंग! विजेचा खेळखंडोबा ; शेतकरी संतप्त; वारणवाडी सबस्टेशनला ठोकले टाळे

पारनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील वारणवाडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या देसवडे, वारणवाडी, जावळदरा आणि बोरमळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतातील पिकांना आवश्यक पाणी देता येत नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी वारणवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनला टाळे ठोकून आपला तीव्र संताप व्यक्त केला.

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना सध्या पाण्याची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र, वारणवाडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, अनेक वेळा तासन्‌तास वीज गायब राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, मका तसेच इतर खरीप पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मेहनत आणि खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यांदेखत करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वीजपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत वारणवाडी सबस्टेशनमध्ये जाऊन कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

“पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय? लाखो रुपये खर्च करून उभी केलेली पिके विजेअभावी जळत असताना महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वारणवाडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून शेतकऱ्यांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Comment