तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! आता जेवणाची पंगत आयोजित करण्याआधी….. नवा आदेश काय?

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) व्यापक अन्न सुरक्षा कृती आराखडा तयार केला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, आता सार्वजनिक ठिकाणी सामूहिक भोजन, पंगत, महाप्रसाद, भंडारा किंवा लंगर आयोजित करणाऱ्यांना कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी प्रशासनाला माहिती देणे आवश्यक राहणार आहे.

सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न तयार केले जाते. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय FDA ने घेतला आहे. कार्यक्रमासाठी भोजन तयार करणाऱ्या केटररने अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरलेला कच्चा माल कुठून खरेदी केला, याची माहितीही उपलब्ध करून देणे अपेक्षित राहणार आहे.

३ सप्टेंबरपासून विशेष कृती आराखडा

FDA कडून ३ सप्टेंबरपासून वर्षभरातील विविध सण-उत्सव लक्षात घेऊन विशेष अन्न सुरक्षा कृती आराखडा लागू करण्यात येणार आहे. ईद, होळी, बकरी ईदपासून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आदी विविध सणांच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या काळात अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने तपासणी आणि नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे.

याबाबत तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, सण कोणत्याही धर्माचा असो, त्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही एका धर्माच्या सणासाठी वेगळे नियम न ठेवता सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांमध्ये अन्न सुरक्षा कायद्यानुसार समान पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.

कोणत्या अन्नपदार्थावर लक्ष राहणार 

जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण कालावधीत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः सणांच्या काळात पुढील अन्नपदार्थांवर FDA चे विशेष लक्ष राहणार आहे—

– उपवासाचे पदार्थ

– खाद्यतेल

– सुकामेवा

– बेकरी उत्पादने

– ऑनलाइन विक्री होणारे अन्नपदार्थ

– महाप्रसाद

– भंडारा आणि लंगरमधील अन्न

महाप्रसाद, भंडारा आणि लंगरमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करून नागरिकांना वाढले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि अन्न साठवणुकीची व्यवस्था यांचीही तपासणी केली जाणार आहे.

स्वयंपाकी आणि आयोजकांना प्रशिक्षण

सामूहिक भोजनाचे आयोजन करणारे आयोजक तसेच अन्न तयार करणाऱ्या स्वयंपाक्यांना फूड सेफ्टीबाबत नियमित प्रशिक्षण देण्याचीही योजना FDA ने आखली आहे. अन्न तयार करताना स्वच्छता, कच्च्या मालाची योग्य हाताळणी, साठवणूक आणि अन्न दूषित होऊ नये याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.

दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नाची उलाढाल होत असल्याने अन्न भेसळ रोखण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी FDA ची ही विशेष मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Comment