संगमनेर (DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या जागेबाबत राजकीय वातावरण तापू लागले आहे. ‘एमआयडीसी घारगावला होणार, बोटा येथे होणार,’ अशा वावड्या उठवून काही जण स्टंटबाजी करत आहेत, असा आरोप करत आमदार अमोल खताळ यांनी आमदार सत्यजित तांबे यांना लक्ष्य केले. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी संगमनेर तालुक्याची एमआयडीसी कौठे मलकापूर येथेच होणार, असा ठाम दावा खताळ यांनी केला.
कौठे मलकापूर येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या जागेची आमदार खताळ यांनी सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी प्रस्तावित जागेची स्थिती आणि औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, पुणे येथील कार्यकारी अभियंता संजय कोतवाड, अहिल्यानगरचे उपरचनाकार सुहास लाहोटी, सहाय्यक अभियंता राहुल बळी, प्रमुख भूमापक फुलचंद कातकडे, एकनाथ ठाकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब खेरनर हरिभाऊ गीते, रऊफ शेख, गुलाबराजे भोसले, रवींद्र दातीर, ॲड. अमित धुळगंड, अनिल आमले, गणेश डोंगरे, गोरख बागुल आणि नवनाथ गंभीरे यांचा समावेश होता. साकूर पठार भागातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयडीसीसाठी वरिष्ठांकडे सातत्याने पाठपुरावा
आमदार खताळ म्हणाले, संगमनेर तालुक्यात एमआयडीसी उभारण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वारंवार केली आहे. संगमनेर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संगमनेरमध्ये एमआयडीसी उभारण्याबाबत शब्द दिला होता. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेने काम करण्याची संधी दिल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण दिवस-रात्र प्रयत्नशील आहोत. मात्र, तालुक्यातील विकासकामांबाबत विनाकारण संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. संगमनेरच्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे, त्यामुळे विकासकामांत अडथळे आणू नका. विकासाला विरोध केल्यास आगामी काळात सर्वसामान्य जनता त्याचे उत्तर देईल, असा इशाराही खताळ यांनी विरोधकांना दिला.
नामांकित कंपन्यांकडून गुंतवणुकीची तयारी?
गेल्या चाळीस वर्षांत जे साध्य झाले नाही, ते एका सर्वसामान्य तरुणाला अवघ्या दीड वर्षात करून दाखविण्याची संधी मिळाली आहे. याचे शल्य काहींच्या मनात असल्याने अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कौठे मलकापूर येथील प्रस्तावित एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी तयारी दर्शविल्याचा दावा करत या औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्याची उपलब्धता राखण्याचा शब्द
आमदार अमोल खताळ म्हणाले, “कौठे मलकापूर येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी आवश्यक असलेले पाणी राखीव ठेवण्याचा शब्द राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे पाण्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना लवकरच आणणार आहोत.”
प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची पाहणी झाल्यानंतर आता या प्रकल्पाच्या पुढील प्रशासकीय प्रक्रिया, जमीनविषयक बाबी आणि प्रत्यक्ष उभारणीबाबत शासन व एमआयडीसीकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
