संगमनेर (DSNews24 / किरण पुरी) – राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. सरकारने पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत द्यावी. केवळ घोषणा न करता निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कौठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब आणि पिंपळगाव देपा आदी गावांमध्ये थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोयाबीन, भुईमूग आणि बाजरी या पिकांच्या स्थितीची पाहणी करत शेतकरी, महिला व युवकांशी संवाद साधला.
पिके करपली; पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर
पाहणीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत कठीण बनली आहे. हाताशी आलेली पिके करपली आहेत. सोयाबीन काढण्याचीही परिस्थिती राहिलेली नाही. शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. चाऱ्याअभावी पशुधनाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा यांची तातडीने व्यवस्था करावी. दुष्काळामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह सर्व दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
सहा महिन्यांपासून मानधन आणि निराधारांचे पैसे रखडल्याचा आरोप
ग्रामीण भागातील अकुशल कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे मानधन शासनाकडून मिळाले नसल्याचा आरोप थोरात यांनी केला. यामुळे संबंधित कुटुंबांच्या दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही अनेक नागरिकांना सहा महिन्यांपासून मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचत नसेल तर त्या घोषणांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
शेतकरी महिलांनी मांडल्या व्यथा
पाहणीदरम्यान अनेक शेतकरी महिला आणि नागरिकांनी आपल्या अडचणी थोरात यांच्यासमोर मांडल्या. आर्थिक संकट, पाणीटंचाई आणि शेतीतील नुकसान यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन करताना काही महिलांना अश्रू अनावर झाले. यावेळी थोरात यांनी नागरिकांना दिलासा देत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी सभापती शंकरराव खेमनर यांनीही राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्याऐवजी बैठका आणि चर्चांवर भर दिला जात असल्याची टीका त्यांनी केली. मागील सरकारच्या काळात कर्जमाफी, दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीकविम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळत होती; मात्र सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले.
जयराम ढेरंगे यांनी बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, युवा नेते बाळासाहेब सागर, मीराताई शेटे, जयराम ढेरंगे, सुजित खेमनर, सुदाम सागर, शिवाजी साकुरे, शशिकांत बेरड, लक्ष्मण गीते, पांडुरंग सागर, बाबासाहेब भोसले, भास्कर कारंडे, निवृत्ती गि-हे, राहुल गंभीरे, रोहिदास मुंडे, भाऊसाहेब गांजवे, जाकीर मोमीन, पोपट घाडगे, के. के. पावडे, सरपंच हौशीराम खेमनर, तुकाराम गुळवे, साहेबराव बारवे, नाना गुळवे यांच्यासह कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.
दिल्लीतील आंदोलनानंतर थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
बाळासाहेब थोरात हे सोमवारी दिल्ली येथे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा संगमनेरमध्ये परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्यांनी पठार भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी थोरात यांनी यापूर्वीही आवाज उठवला होता. संगमनेरमध्ये काढलेल्या मोर्चासह विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला होता. आता प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
