बिग ब्रेकिंग! अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ; आरोपींच्या ट्रेनमधून सिनेस्टाईलने पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतून फरार झालेल्या तिन्ही आरोपींना ९०१ किलोमीटरवरून ताब्यात घेण्यात आलं आहे. तिघांना धावत्या ट्रेनमधून सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राजस्थानमधील कोटा येथे एजीटीएफ (AGTF) आणि कोटा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांनी या कारवाईची अधिकृत पुष्टी केली आहे.

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून आवळल्या मुसक्या

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्यानंतर हे सर्व आरोपी पसार झाले होते. ते प्लॅननुसार ठरलेल्या मार्गाने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. हे आरोपी मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. याच इनपुटच्या आधारे एजीटीएफ आणि कोटा पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून कोटा रेल्वे स्थानक परिसरात ही धडक कारवाई केली आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

आरोपी हरियाणा आणि महाराष्ट्रातील

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोघे जण हरियाणाचे रहिवासी आहेत, तर एकजण महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यामध्ये नेमकी कोणा-कोणाची काय भूमिका होती आणि त्यांना कुणाची मदत मिळत होती, याबाबतची कसून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यामागील संपूर्ण कट लवकरच उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

संशयित हल्लेखोर कोणत्या ट्रेनमधून पळाले?

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपी पुणे-जयपूर एसएफ एक्सप्रेसमधून पळाल्याची माहिती आहे. ही ट्रेन पुण्याहून उत्तरेकडे प्रवास करते आणि मुंबई महानगर क्षेत्रातून जाते. कल्याण जंक्शन आणि वसई रोड येथे ती नियोजित थांबे घेते. त्यानंतर ती गुजरात आणि मध्य प्रदेशमधून प्रवास करून राजस्थानमध्ये प्रवेश करते, जिथे ती आपल्या अंतिम गंतव्यस्थान जयपूरच्या मार्गावर कोटा जंक्शनवर थांबते. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई परिसरात ट्रेनमध्ये चढले होते, परंतु ट्रेन कोटा स्टेशनवर पोहोचल्यावर कोटा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Leave a Comment