महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; अहिल्यानगरमध्येही पावसाची शक्यता

अहिल्यानगर – नैऋत्य मोसमी पावसाने देशातून माघार घेतली असली, तरी महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवामान प्रणाली विकसित होण्याचे संकेत मिळत असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, अहिल्यानगरसह अन्य काही जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत १९ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अहिल्यानगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

२० ऑक्टोबरलाही वादळी पावसाचे संकेत

२० ऑक्टोबर रोजी रायगड, पुणे, सातारा, बीड आणि परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूरसह नांदेड जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सध्या उकाडा व तीव्र उष्णतेचा अनुभव येत आहे. मात्र, हवामानातील बदलांमुळे २० ऑक्टोबरच्या सुमारास मुंबईसह आसपासच्या भागांत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांनाही पावसाचा फटका बसू शकतो.

ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत पावसाचे संकेत

भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार, २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. तसेच, २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे संकेत आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतीकामे, काढणीला आलेली पिके आणि शेतमालाच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीकामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. वादळी पावसाचा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे.

हवामान प्रणालीच्या हालचालींनुसार पावसाचे ठिकाण आणि तीव्रता बदलू शकते. त्यामुळे पुढील हवामान अंदाज आणि जिल्हानिहाय सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment