गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतिक्षेत असणार मान्सून राज्यातील अनेक भागांत दाखल झाला आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाने थांबवलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला आहे. २३ जूनपासून राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय झाला आहे. त्यानंतर २४ जून रोजीही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.
मुंबई, पुणे अन् कोकणात पाऊस सुरु झाला आहे. राज्यात अजून कोठेही वाहून निघेल असा पाऊस झालेला नाही. आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा सकारात्मक अहवाल दिला आहे. पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा दिले आहे.
कुठे कसा पडणार पाऊस
राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी टि्वट करुन दिली. पुढील पाच दिवसांत कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस असणार आहे.
पुणे, सातारा, नाशिकमध्येही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर राहणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद निर्माण झाला आहे.
