17 व्या लोकसभेतील 545 खासदारांपैकी 270 खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यापैकी 10 खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यातील पहिल्या दहा खासदारांमध्ये नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा समावेश झाला आहे. याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी खा. विखे यांचे कौतुक केले आहे.
केंद्र सरकारच्या 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह इतरही काही सत्रांमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या दहा खासदारांनी सूचिबद्ध केलेले अनेक प्रश्न सभागृहात चर्चेला आले आणि त्यांची उत्तरे संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात दिली.
लोकसभेत तरुण खासदारांनी हिरेरीने सहभाग घेतल्याचे एका अहवालात स्पष्ट झाल्यानंतर लोकसभेचे सभापती बिर्ला यांनी खा. डॉ. विखे यांच्यासह दहा खासदारांचे विशेष कौतुक केले आहे
खा. विखे यांनी लोकसभेच्या 11 सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला असून काही मुद्द्यांवर हस्तक्षेप करत जनते प्रती आपली भूमिका ठामपणे मांडली. गेल्या 4 वर्षात त्यांनी 496 हस्तक्षेप आणि हरकतीचे मुद्दे मांडले आहेत.
खा. विखे यांनी पहिल्याच टर्ममध्ये केवळ विकास कामांवर भर न देता विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहचेल याबाबतच्या चर्चेत सहभाग घेऊन योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. दरम्यान नवोदित खासदारांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून अशाच पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला आहे
