शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे गटाचे नेते टाळ्या वाजवत आहेत, आनंदी असल्याचे दाखवत आहेत.
मात्र, माझी माहिती अशी आहे की, अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळू नये म्हणून शिंदे गट दिल्लीत गेला होता. पण दिल्लीत त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. तेव्हा दिल्लीत भाजप नेतृत्वाकडून त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, तुम्हाला राहायचं तर राहा, नाहीतर जाऊ शकता.
तसेच दिल्लीत शिंदे गटासमोर आणखी एक प्रस्ताव ठेवण्यात आला. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद द्यायचे नसेल तर शिंदे गटाने ते स्वत:कडे ठेवून घ्यावे.
मात्र, त्या मोबदल्यात मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना द्यावे. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर शिंदे गट दिल्लीतून माघारी आला आणि अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली, ही माझी पक्की माहिती असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
