राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नेत्यांची तगडी टीम तयार केली आहे. काँग्रेसने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली असून यात देशभरातील एकूण ३९ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या कार्यकारिणीचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, शशी थरूर यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यकारिणीत अधीर रंजन चौधरी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. ए. के. अँटोनी यांच्या मुलाने (अनिल अँटोनी) अलिकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अँटोनी यांच्याबद्दल अनेकांमध्ये सांशकता होती. परंतु, काँग्रेस कार्यकारिणीत ए. के. अँटोनी यांचा समावेश करून काँग्रेसने त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काँग्रेसच्या ३९ नेत्यांच्या नव्या कार्यकारिणीत अनेक युवा चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यात सचिन पायलट, चरणजीत सिंह चन्नी, कुमारी शैलजा, दीपेंद्र सिंह हुड्डा, गौरव गोगोई, रणदीप सिंह सुरजेवाला अशी काही नावं आहेत.
दरम्यान, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक या दोन नेत्यांवर काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पूर्वीच्या वर्किंग कमिटीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता काँग्रेस पक्षाकडून वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे
