केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क वाढ केली. तसेच नाफेड कांदा बाजारात आणणार असल्याच्या निर्णयाच्या विरोधात नगरसह राज्यभरात शेतकरी संतप्त झाले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील बेमुदत बंदचा निर्णय नाशिक व्यापारी असोशिएशनने घेतला आहे. नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत.
केंद्र सरकारने देशातून होणार्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील हा निर्णय 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील.
आज सोमवारपासून (21 ऑगस्ट) 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली जाईल, असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. स्वस्त दरात कांद्याची ही विक्री नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सहकारी संस्थेद्वारे केली जाईल. एनसीसीएफ सोमवारपासून स्वस्त दरात कांद्याची विक्री करणार आहे. या निर्णयाने नगरसह राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
गत आठ दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता. पण आता या निर्णयामुळे शेतकर्यांच्या मनात भाव पडण्याची भीती आहे. त्यामुळे या निर्णयांना शेतकर्यांकडून कडाडून विरोध होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांत आजपासून बेमुदत कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गत पाच-सहा दिवसापासून कांद्यालाचांगला भाव मिळत होता. परंतु केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्यास सुरुवात केली. त्याचा थेट परिणाम कांदा भावावर झाला.आडीच हजार रूपये विकणारा कांदा दोन हजार रूपयांवर आला.
त्यामुळे राहाता, राहुरी बाजार समितीत जमा झालेले शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकरी संघटनेने या शेतकर्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. घोडेगावात आज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच नेवाशातील सोनईतील शेतकर्यांनी कांदा लागवड न करण्याचा निर्णय घेतला आहे.
