उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे मुंबईतील विक्रोळी विभागातील कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सावंत यांनी पक्ष प्रवेश केला. उपेंद्र सावंत हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.
यावेळी शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबाबतची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करुन दिली आहे.
यावेळी बोलताना सावंत यांनी गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नसल्याने व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे सांगितले. शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या आता ३३ झाली असून त्यातील २५ हे ठाकरे गटाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले
