सोलापुरात शिंदे गटातील मोठी धुसफूस समोर आली आहे. विशेष म्हणजे देशात आगामी लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकांनंतर देशात लगेच विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत.
असं असताना सोलापुरात शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत आणि जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांच्यातील वाद उफाळून बाहेर आलाय.
शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांची तक्रार केली आहे. तसेच शिवाजी सावंत यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारं पत्र चवरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
दुसरीकडे मात्र सोलापूर जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.
पंढरपूर विभागाच्या शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हा अध्यक्षपदावरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्यातूनच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
या वादाचा फटका शिंदे गटाला बसण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर येथे झालेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भांडणं, त्याचबरोबर संपर्क प्रमुखपदी असताना मर्जीतील कार्यकर्त्यांना तसेच शिवाजी सावंत गटाचे ऐकणार त्याला पद आणि सावंत गटाचं ऐकणार नाही त्यांना पद नाही, अशी भूमिका सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचा दावा चरणराज चवरे यांनी केलाय.
