मनोज जरांगे पाटलांकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम..

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जिल्ह्यातील राजगुरूनगर इथे सभा पार पडली. या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटमची आठवण करून दिली आहे.

आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्या संयमाचा अंत पाहू नका, आरक्षण विषय गांभीर्यानं घ्या असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे सरकणार नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका, सरकारने आरक्षण विषय गांभीर्यानं घ्यावा. शांततेच्या मार्गानेच आरक्षण घ्यायचं हा माझा शब्द, आमचं आंदोलन आताही शांततेत सुरू आहे.

मी माझा शब्द कधीच बदलणार नाही, समाजाशी गद्दारी करणार नाही. जो त्रास आमच्या वाट्याला आला तो आता मुलाबाळांच्या वाट्याला नको, असं यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की, आम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे आम्ही सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला. 2004 च्या जीआरनुसार आरक्षण द्या अशी मागणी आम्ही केली.

मात्र ज्या जीआरमध्ये मराठ्यांचं हीत नाही तो जीआर आम्हाला मान्य नाही. घरातील प्रत्येक माणसाला आरक्षणाचं महत्त्व माहिती हवं, म्हणून मराठ्यांनो उद्यापासून कामाला लागा, घराघरात जाऊन आरक्षणाचं महत्त्व समजून सांगा, असं आवाहनही यावेळी जरांगे पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान शेती करणाऱ्यांना कुणबी असं म्हणतात, शेतकरी हा सुधारित शब्द आहे. मराठा शेती करतो. त्यामुळे कुणबीमधून आरक्षणाची मागणी केली ती योग्यच असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment