राज्य सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे, पण या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट विखे पाटील आणि भाजपला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव मधल्या काळात मुख्यमंत्रिपदासाठी घेतलं जात होतं, त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपमधल्या काही नेत्यांनी विखेंच्या जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळी यादीत घेतला नसल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.
‘नगर जिल्हा पूर्णपणे वगळण्यात आला होता, याच्यामागचं राजकारण मला तरी माहिती नाही. पण मध्ये कदाचित विखे पाटलांची मुख्यमंत्री होण्याची चर्चा जोरात रंगत होती, त्यामुळे मुद्दामहून सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी त्यांना अडचण व्हावी म्हणून त्यांचाच जिल्हा महसूल मंत्री असताना सुद्धा वगळला का,’ असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
