शिवसेना कुणाची यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwkar) निवडणूक आयोगाचा निकाल कायम ठेवत शिंदेंचा दावा मान्य केला.
शिवसेनेत फूट पडताना बहुमत हे शिंदेंकडे असल्याचं सांगत राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं सांगितलं आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट (Ajit Pawar) मात्र निश्चिंत झाला असून शरद पवार (Sharad Pawar) गटाची धाकधूक मात्र वाढल्याचं दिसतंय. कारण जो न्याय शिदेंना मिळाला तोच न्याय अजित पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल आला असून विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही. पण त्याचवेळी बहुमताच्या आधारे त्यांनी शिंदेंचा शिवसेनेवरील दावा मान्य केला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे.
बहुमताचा आधार घेतला तर अजित पवार वरचढ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगात त्यांची लढाई सुरू आहेत, त्याचसोबत विधीमंडळातही त्यांचा वाद सुरू आहे.अशा वेळी जर विधीमंडळात बहुमताचा आधार घेण्यात आला असेल तर अजित पवारांची बाजू वरचढ ठरते.
राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांकडे आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर राष्ट्रवादी कुणाची यावर निकाल देणार असतील आणि शिवसेनेप्रमाणे त्यांनी जर बहुमताचा आधार घेतला तर अजित पवारांची बाजू भक्कम दिसतेय.
