काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच आयोजन देखील वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात करण्यात आलं.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात थोरात व तांबे कुटुंबीयांबरोबर पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील निवासस्थानी भेट देत बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
निवासस्थानासमोर झालेल्या या सोहळ्यात बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेबांचा स्वभावच समोर मांडला.
साहेब आता 70 वर्षांचे होताय. मी त्यांच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान.. साहेब जेव्हा मला पाहायला आले तेव्हा मी त्यांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केले. त्यांनी माझा चेहरा पाहिला असेल मात्र मी फक्त पायच पाहू शकले. आमचा योगायोग होता म्हणून लग्न जमलं. लग्नानंतर वीस वर्ष कधी पिक्चर व नाटकाला सुद्धा नेलं नाही. रोज फक्त पावणेरावळे हेच करत आले.
साहेबांनी मला अमेरिका, दुबई खूप फिरवलं. मात्र ते 30 वर्षानंतर…साहेबांना वेळच नव्हता. रोज राजकारण ते लोक असंच.. घरात आले की चेहरा पडलेला दिसायचा मात्र कार्यकर्ते आले की लगेच जायचे व दीड दोन तास बोलत बसायचे.
फक्त आपल्या समोर आले की, मी थकलो झोप येते हे सुरू व्हायचं. मी जे बोलतेय ते मनातलं आहे, पाठांतर केलेले नाही. मला कुटुंबाने खूप साथ दिली. नंतर मी मैत्रिणींचा ग्रुप बनवला, त्यांनी खूप साथ दिली त्यामुळे आता काय मला ही साहेबांची आठवण येत नाही.
