संगमनेर : संगमनेरहून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडक बसल्याने भिषण अपघात झाला. या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मयत सर्व तरुण तालुक्यातील चिखली येथील रहिवासी आहेत. या अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20) व निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही रा. चिखली, ता. संगमनेर) अशी आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) असे असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सदरची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हार घोटी मार्गावर मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ घडली. संगमनेरातून चिखलीच्या दिशेने आपल्या घराकडे निघालेले चौघे तरुण दोन मोटरसायकल वरुन जात होते.
यावेळी मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ अकोल्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या प्रभात डेअरी दुधाच्या टँकरला दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला
