मोठी बातमी! महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढणार….

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आज भाजप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एक जागेबाबत निर्णय झाला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार आहेत. गुरुवारी ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. मविआच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यावर होकार दिला आहे. उद्धव ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून विधान परिषदेची केवळ एक जागा निवडून येईल इतकेच संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यात उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० एप्रिल आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीच उद्धव ठाकरे अर्ज भरणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे हे आधी निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. ते त्यांच्या इतर नेत्यांना संधी देण्यास इच्छुक होते. ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, वैभव नाईक, सूरज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची नावे विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत.

परंतु उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार नसतील, तर ही एक जागा आपल्या वाट्याला यावी, अशी काँग्रेसची मागणी होती. परंतु आता ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment