साकूरमधील कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद, नेमकं कारण काय

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) राज्यभरातील अंदाजे 85 हजार कृषी सेवा केंद्र दि. २७ एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय खते आणि बियाणे विक्रेत्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचक धोरणाच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालकांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला संगमनेर तालुक्यातील साकूरसह पठार भागातील अनेक कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिला आहे. या बेमुदत बंदमध्ये २५ ते ३० कृषी सेवा केंद्राचे चालक सहभागी झाले आहे. आजपासून ही सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी अत्यावश्यक असलेली खते, कीटकनाशके आणि बियाण्यांच्या पुरवठा ठप्प झाला आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असताना हा संप सुरू झाल्याने पठार भागातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

काय आहे मागण्या?

खत कंपन्यांकडून लिंकिंग बंद करावे, अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाणे प्रतिबंधित करावे, साथी पोर्टलची सक्ती न करता ते बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपनीस्तरावर सुरू करावे, रासायिक खत वितरण विक्रेतयंच्या विक्री केंद्रापर्यत एफओआर (फॉर) पद्धतीने करावे, रासायनिक खतांचे मार्जीन मिळावे, बियाणे, खते, कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता कायद्यातील तरतुदीनुसार साक्षीदार म्हणून मान्य करावे. गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलच्या प्रलंबित रक्कमा शासनाकडून विक्रेत्यास मिळाव्यात. तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासंबंधी कृषी विभागाने काढलेली अधिसूचना रद्द करावी. मुदतबाह्य किटकनाशके पुरवठादार कंपन्यांनी परत घेण्याची सक्ती करावी, या मागण्यांसाठी कृषी सेवा केंद्रांनी बेमुदत संप पुकारला आहे.

दरम्यान, कृषी सेवा केंद्रांच्या संपामुळे बाजारातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून काळा बाजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून संप मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Leave a Comment