नगरची विखे-लंके लढत राज्यातील लक्षवेधी लढतीत गणली जाणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके ‘पॉवर’फुल्ल उमेदवारासाठी चाचपडणार्‍या महाविकास आघाडीच्या गळाला आयतेच लागले. त्यापूर्वीच भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. आ. लंके गुरुवारी शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून माध्यमांना सामोरे गेल्याने ‘लोकसभेचा उमेदवार ठरला,’ असाच संदेश त्यातून दिला गेला. आता भाजपचे सुजय विखे-पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. लंके यांच्यातील अटीतटीचा सामना नगरच काय, तर अवघ्या राज्याला पाहावयास मिळणार आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर आणि राहुरी हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. लंके हे पारनेरचे आमदार. राष्ट्रवादी दुभंगण्यापूर्वीच ते लोकसभेच्या तयारीला लागले होते. शरद पवारही त्यांना प्रोजेक्ट करत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. लंके हे अजित पवारांसोबत गेले.

त्यामुळे विखेंविरोधात कोण, याची चर्चा नगरकरांमध्ये रंगली होती. एकतर्फी लढत होऊन विखे खासदार होतील, असेही बोलले जात होते; मात्र महायुतीत असूनही ‘शिवस्वराज्य यात्रे’पाठोपाठ ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याआडून लंके लोकसभेची पायाभरणी करतच होते.

अखेर लोकसभेच्या तोंडावर घरवापसी करत आ. लंके हे शरद पवारांच्या संगतीला गेले अन् त्यापाठोपाठ नगरचे चित्र स्पष्ट झाले. आता त्यांचा सामना भाजपच्या विखेंशी होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच नगरची विखे-लंके लढत राज्यातील लक्षवेधी लढतीत गणली जाणार, हे नक्की!

Leave a Comment