भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची तयारी वेगळी आहे. विरोधकांना तुरुंगात डांबायचे. त्यांच्यावर ईडी, सीबीआय सोडायचे, ही भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची तयारी आहे. भाजप पुन्हा निवडून आली तर 2029 ची निवडणूक रशिया प्रमाणे होईल.
समोर एकही विरोधक नसेल फक्त एकाच व्यक्तीला मतदान करावे लागेल. पण भाजप नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही विरोधकांना तुरुंगात डांबू शकता. मात्र जनतेला डांबू शकत नाही, असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला दिला. हर्षवर्धन पाटलांचा नामोल्लेख टाळून थोरातांनी जुन्या मित्राला टोला लगावला.
इंदापूरमध्ये महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत आहे. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, बारामती लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवारांनी कोणत्याही सत्तेसाठी लढण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर लोकशाही तत्त्व, पुरोगामी महाराष्ट्राचे तत्त्व, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार. जो बहुजनांचा विचार आहे. बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार आहे. राज्यघटनेचा विचार आहे. राज्यघटनेतील तत्त्व हे आमचे तत्त्व आहेत, आणि त्यांची पाठराखण करणे ही आमची जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवून शरद पवार धावपळ करत आहेत. हे तत्त्व, विचार वाचवण्यासाठी शरद पवारांनी लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
