मनोज जरांगे पाटील यांचा यु-टर्न, लोकसभेबद्दल केली मोठी घोषणा 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आवाहन केलं आहे. यापूर्वी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला होता. मात्र, त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली आहे.

यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. 30 एप्रिलपर्यंत या संदर्भात निर्णय घ्या, आढावा बैठका आयोजित करा आणि मला अहवाल द्या असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, आता अहवाल आल्यानंतर मनोज जरांगे पाटील निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा, अशी भूमिका जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीविषयी जाहीर केली.

आज जरांगे पाटलांनी गावागावातून अहवाल मागवला होता. मात्र, हा अहवाल अर्धवट असून गावागावतल्या मराठ्यांपर्यतचा अहवाल आलेला नाही. त्याचबरोबर या अहवालात अनेक चुकाही असल्याचं जरांगे पाटलांनी म्हंटलं आहे. त्यामुळं या अहवालावर मी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. मी मराठा समाजाची हार करणार नाही. त्यामुळं अपक्ष उमेदवार देणार नसून ज्याला पाडायचं त्याला पाडा.

तुमच्या बाजून जो असेल त्याला निवडून द्या. हे मराठ्यांनी ठरवा. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पडायचं नाही, असं जरांगे पाटलांनी जाहीर केलंय. मात्र, नंतरही यांनी सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा, असं म्हणत पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला.

Leave a Comment