कौठेमलकापूरच्या सौर प्रकल्पाविरोधात आंदोलन, गुलाब भोसले, रविंद्र दातीर, रणजित ढेरंगेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील कौठेमलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध दर्शविण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्थापित केलेल्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, रविंद्र दातीर, रणजित ढेरंगे यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, सौर प्रकल्पाचा कोणताही कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित नसल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रस्तावित जागेवरून सौर प्रकल्पाचे सर्व साहित्य तातडीने हटवावे आणि सौर प्रकल्पाचे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी विविध आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भाषणे करत औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणूनच या ठिकाणी सौर प्रकल्प आणण्यात आला आहे का, असा सवाल उपस्थित केला. या प्रकल्पामागे नेमका कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

आंदोलनादरम्यान दोन दिवसांच्या आत सौर प्रकल्पाचे साहित्य प्रस्तावित जागेतून हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुलाबराजे भोसले यांनी दिला. यावेळी त्यांनी संतप्त भाषणात जाळपोळीचा इशाराही दिला.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलन आक्रमक झाल्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, रणजित ढेरंगे, सरपंच रविंद्र दातीर, सोमनाथ बारवे यांच्यासह सुमारे १० ते १२ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Comment