जुन्नर हादरले! १० वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर हत्या, शेजारीच निघाला नराधम 

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित मुलगी मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतर आळेफाटा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दरम्यान, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लेंडेस्थळ येथे ओढ्याच्या कडेला एका झाडाजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला.

सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित ताब्यात

मुलीचा शोध सुरू असताना पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या तपासादरम्यान एका २५ वर्षीय तरुणावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीतून मुलीचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणाची माहिती मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, संशयित तरुण हा मुलीच्या शोधासाठी सुरू असलेल्या तपासात ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात सहभागी होत होता. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

ओळखीचा फायदा घेतल्याचा प्राथमिक संशय

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला घरातून शेताच्या दिशेने नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीकडे कसून चौकशी केली जात आहे.

पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधून तपासाबाबत माहिती घेतली.

दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Comment