बिग ब्रेकिंग! साईबाबा पतसंस्थेच्या चेअरमन, मॅनेजर, कॅशियरसह थकीत कर्जदारांच्या मालमत्तेचा लिलाव 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील बहुचर्चित साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कोट्यावधींच्या घोटाळ्यानंतर आता पतसंस्था पुन्हा चर्चेत आली आहे. काही वर्षांपासून अवसायनात असलेल्या पतसंस्थेवर सहकार विभागाने अवसायकाची नेमणूक केली आहे. तसेच थकबाकीदारांवर असलेली रक्कम थकबाकीदारांनी भरलीच नसल्याने अखेर अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशन व संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनने चेअरमन, मॅनेजर, कॅशियर व काही थकबाकीदार कर्जदारांच्या स्थावर मालमत्ताच लिलावात काढल्या आहे. ३० एप्रिल २०२४ पर्यंत वसूल पात्र रक्कम व त्यावरील होणारे व्याज व इतर खर्च भरण्याची नोटीसच संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी टी. टी. पवार तसेच अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी जे. डी. काळे यांनी काढली आहे.

तसेच या लिलावाचे फ्लेक्स बोर्ड देखील साकूर चौफुली व पतसंस्थेच्या खाली लावण्यात आले आहेत. त्यामुळे साकूर पठार भागात एकच खळबळ उडालीय. तसेच या फ्लेक्स बोर्डने ये – जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी अशी कि, सन २०१७ साली साईबाबा पतसंस्थेचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. अनेक ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेत अडकले होते. त्यानंतर मोजक्या ठेवीदारांनी कायदेशीर लढाई करत आपल्या ठेवी परत मिळवल्या होत्या. परंतु चेअरमन, मॅनेजर व कॅशियर या घोटाळेबाजांकडे तसेच काही कर्जदारांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली बाकी आहे. तसेच वारंवार नोटीसा देऊनही वसुली पात्र रक्कम न भरल्याने अखेर त्यांच्या स्थावर मालमत्ताच लिलावात काढल्या आहेत.

साईबाबा पतसंस्थेच्या थकबाकीदारांविरुद्ध महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१/९८ब अन्वये वसुली दाखले मिळविले असून त्यांच्यावर रितसर मागणी नोटीस बजावली होती. तरीही थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम भरली नसल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७/ (१०) नुसार मा. जिल्हा उप-निबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांनी प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरुन विशेष वसुली व विक्री अधिकारी टी. टी. पवार व अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी जे. डी. काळे यांनी स्थावर मालमत्ता थकित येणे रक्कम वसुलीसाठी स्थावर मालमत्तेच्या लिलावाची नोटीस काढली आहे.

 

कसा होणार लिलाव

https://eauction.gov.in या सांकेतिक स्थळावर व (साईबाबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., बिरेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या संस्थेच्या साकुर येथील कार्यालयात दि. ३०/०४/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता हा आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत वसुल पात्र रक्कम व त्यावरील येणे व्याज व इतर खर्च न भरल्यास जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येईल व संस्थेस येणे असलेल्या वसुल पात्र रक्कमेचा भरणा केला जाणार आहे. तसेच स्थावर मालमत्ता जाहीर लिलावाने विक्री करुन ही वसुल पात्र रक्कमेएवढी रक्कम न आल्यास जामिनदारांकडून प्राधान्याने वसुली केली जाणार आहे.

 

लिलावाचे ठिकाण व वेळ – 

तसेच लिलावाच्या दिवशी दि. ३०/०४/२०२४ रोजी लिलावात कोणीही भाग न घेतल्यास फेर लिलाव नं. २ दि. १६/०५/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता संस्थेच्या कार्यालयात होईल. तसेच या लिलावात बोली बोलण्यास अथवा योग्य किंमत न आल्यास अंतिम लिलाव दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी-११:३० वाजता https://eauction.gov.in या सांकेतिक स्थळावर व (साईबाबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., बिरेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या संस्थेच्या साकुर येथील कार्यालयात होईल.

Leave a Comment